पूर्णाच्या लॉजमध्ये नांदेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

▫️मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही
पूर्णा :- १८ जुलै २५
शहरातील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या ‘इंडियन लॉज’मध्ये नांदेड येथील एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव आनंद वासुदेवराव विष्णुपुरीकर (वय ४८, रा. विष्णुपुरी, नांदेड) असे आहे. ही घटना आज, दि. १७ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विष्णुपुरीकर यांनी १६ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता इंडियन लॉजमध्ये रूम बुक केली होती. मात्र, १७ जुलै रोजी चेकआऊट वेळेपर्यंत त्यांनी दरवाजा उघडला नव्हता. लॉज व्यवस्थापकांनी दुपारी १२.३० च्या सुमारास दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी आनंद हे पलंगावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले, प्रल्हाद घोळवे आणि दत्ता कुंभारगावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पूर्णा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
लॉजच्या नोंदणी पुस्तकातील माहिती आणि आधार कार्डाच्या आधारे मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ते उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा नैसर्गिक मृत्यू की काही संशयास्पद कारण? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.



