दुर्दैवी घटना : खदानीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात सर्वत्र हळहळ

◽️लग्नासाठी मामाकडे आलेल्या संघर्षसोबत निखिलचाही अंत
नांदेड प्रतिनिधी:- ३० मे २५
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. खदानीतबुडून दोन शाळकरी अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे यांचा समावेश आहे. संघर्ष परघने हा आपल्या मामाच्या गावी, गारगव्हाण येथे, एका लग्नासाठी आलेला होता. रविवारी सकाळी संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल दोघेही शेताकडे चालत जात होते. पावसामुळे रस्त्यात चिखल साचलेला होता. चालताना अचानक संघर्षचा पाय घसरून तो शेजारच्या खोल खदानीत पडला. संघर्षला वाचवण्यासाठी निखिल धावून गेला, पण तोही त्याच खदानीत बुडाला.
स्थानिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर उशीर झाला होता. ही दुर्दैवी घटना गावासाठीअत्यंत धक्कादायक असून, दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खदानींची तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.



