विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

मुखेड प्रतिनिधी:- ०८ जून २५
मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली तेआठवीपर्यंतच्या २९ हजार ४६६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. समग्र शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या माध्यमातून ही पुस्तके प्राप्त झाली असून, एकूण १ लाख ७४ हजार ९८४ पुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे.
पुस्तकांचे वितरण शाळा प्रवेशदिनी होण्यासाठी गटसाधन केंद्र मुखेडमार्फत जोरदार तयारी सुरू आहे. तालुक्यातील १६ केंद्रांवर – मुखेड, ब्राँच मुखेड, हिप्परगा, माकणी, बाराहाळी, डोरनाळी, दापका, गुडोंपत, मुक्रामाबाद, गोजेगाव, अंबुलगा, राजुरा, पाळा, होनवडज, खरबखंडगाव, माऊली व हंगरगा – येथे पुस्तकेपाठवण्यात आली आहेत.
या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी हामिद दौलताबादी यांच्या मार्गदर्शनाखाली गटसमन्वयक शिवाजीराव येवतीकर, डॉ. शिवाजी कराळे, नागनाथ द्याडे, डी.एम. देवकत्ते, उत्तम चव्हाण आदीअधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख, कर्मचारी, कार्यालयीन सहकारी परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात सुरळीत होणार असून, पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



