जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न ५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा! शिक्षक परिषदेची जिल्हा परिषदेकडे मागणी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- १८ ऑगस्ट २६
जिल्ह्यातील शिक्षकांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आगामी शिक्षक दिनापूर्वी, म्हणजेच ५ सप्टेंबरपर्यंत तातडीने निकाली काढावेत, अशी आग्रही मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रश्नांसंदर्भात शिक्षक परिषदेचे एक शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले होते. मात्र, ते बाहेर दौऱ्यावर असल्याने शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द केले व प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याची मागणी केली.
या निवेदनात प्रामुख्याने चटोपाध्याय, तसेच वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे. गटस्तरावर ‘ई-ऑफिस’ सक्तीमुळे भविष्य निर्वाह निधी (भनिनि) आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रस्ताव नाकारले जात असून, ते स्वीकारण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट आदेश निर्गमित करावेत. तसेच, शिक्षक परिषदेचे जिल्हा सहकार्यवाह गजानन निळकंटवार यांनी दाखल केलेल्या मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (याचिका क्र. ७५२४/२०२६, दि. १५ जुलै २०२६) च्या निर्णयानुसार, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी व घरभाडे भत्ता लागू करावा, हिंदी व मराठी भाषा सूट प्रस्तावांचे आदेश त्वरित निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच एनपीएस (NPS) धारकांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम दरमहा त्यांच्या खात्यात नियमित जमा करावी आणि जिल्हा बदलीने उपस्थित डीसीपीएस (DCPS) धारकांची रक्कमही त्यांच्या एनपीएस खात्यात वर्ग करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजीच घेऊन जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा शिक्षक दिनीच यथोचित सन्मान करावा. सन २०२५-२०२६ च्या संचमान्यतेत केंद्र समन्वयक पद शून्य दाखवल्याने नवनियुक्त समन्वयकांचे वेतन थकीत आहे, ते पद दर्शवून त्यांचे रखडलेले वेतन तत्काळ अदा करावे आणि भविष्य निर्वाह निधीच्या वार्षिक स्लिपमधील त्रुटी दूर करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्पचे आयोजन करावे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळात राज्याचे प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे, जिल्हा प्रवक्ते रवी ढगे, ज्येष्ठ सल्लागार विजयकुमार गबाळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ईटलोड, संगमेश्वर पडलवार, जिल्हा सहकार्यवाह गजानन निळकंटवार, मुजाहिद शेख, संग्राम नागलगावे, जिल्हा संघटक गोविंद कोरबड, नांदेड तालुकाध्यक्ष भगवान बकवाड, कंधार तालुकाध्यक्ष जलील मोमीन, नांदेड तालुका उपाध्यक्ष गजानन मुड्डले, आनंदा तडखेले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. याबाबतची अधिकृत माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील थडीसावळीकर यांनी दिली आहे.



