हणेगाव आश्रमशाळेत जेवणातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; भोजनाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

◽️चिकनच्या जेवणानंतर मळमळ व उलट्यांचा त्रास
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क देगलूर : १० ऑगस्ट २६
देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी (९ ऑगस्ट) रात्री जेवणातून तब्बल ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, सर्वांना उपचारासाठी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र याघटनेमुळे आश्रम शाळेतील भोजन व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हणेगाव येथील या निवासी आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी रात्रीच्या जेवणात चिकनचा बेत आखण्यात आला होता. मात्र, जेवण झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अनेक विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्री दहा वाजता सर्व ३२ बाधित विद्यार्थ्यांना तातडीने देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाल्याने सुरुवातीला मोठी लगबग उडाली. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पाटील आणि त्यांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. सद्यस्थितीत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्या बाहेर असून, परिस्थितीनुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्टकेले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची आणि आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची केवळ वरवरची चौकशी न करता भोजनाचे नमुने, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघराची स्वच्छता, चिकनची खरेदी आणि ते शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अशा सर्वच बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि या हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडेआता सर्वांचे लक्ष लागून आहे.



