रोजगार हमी योजनेच्या कामाचे बिल काढताना लाच मागितल्याचा लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांच्यावर आरोप

▫️प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीची लेखी तक्रार
मुखेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५
मुखेड : पंचायत समितीतील सहाय्यक लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांकरिता बिल काढताना थेट लाच मागितल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष संजय सुदामराव कांबळे यांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे की, “काम झालं असूनही मस्टर पुढे पाठवायचा नाही. बिले दडपून ठेवायची. आणि दुसरीकडे बोगस काम करणाऱ्यांना पैसे दिल्यास बिले तात्काळ मंजूर!” हा प्रकार म्हणजे थेट गरीब मजुरांची लूट असून, पंचायत समितीचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेला आहे, असा आरोप त्यांनी केला. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, नरमिटवार यांच्याकडून सातत्याने आर्थिक मागणी केली जाते. सामान्य मजुरांना काम करूनही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रचंड पिळवणूक होत आहे. सदर प्रकाराची तातडीने चौकशी करून नरमिटवार यांची बदली करावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीजोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. अन्यथा दिव्यांग आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. पंचायत समितीमध्ये सुरू असलेल्या या कथित भ्रष्ट कारभारामुळे स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा सज्जड इशाराही यात देण्यात आला आहे.



