धक्कादायक: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन

केज | श्रमिक एकता न्यूज (प्रतिनिधी) ०९ एप्रिल २६
केज तालुक्याचे तरुण आणि कार्यक्षम तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात जागीच निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आपल्या खाजगी कारने प्रवास करत होते. लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. गाडी वेगात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कारमध्ये ते एकटेच होते, अशी माहिती समोर येत आहे.
राकेश गिड्डे यांची केज तालुक्यात एक कार्यक्षम आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. केज तालुक्यातील नागरिक आणि अधिकारी वर्गाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.



