
- ▫️नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणीसाठा व वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा
- ◽️नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती शासनाला सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश
- ◽️संभाव्य पाणीटंचाई व चारा टंचाई निवारणासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- १७ सप्टेंबर २६
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देऊन आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, धरणांमधील पाणीसाठा आणि वीजपुरवठा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसातील खंड आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांची वाढ खुंटली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, पिकांच्या संभाव्य नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
आगामी काळात उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी महसूल, कृषी, महावितरण आणि पाणीपुरवठा या सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सक्त सूचना पालकमंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या आढावा बैठकीला आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह महावितरण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, पाणी आराखडा, वीजपुरवठा आणि संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी चारा लागवड व केटीवेअर बंधाऱ्यांच्या प्रस्तावित उपाययोजनांची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली.



