चाकूर हादरले! दोन मुले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६
लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सकाळी घराबाहेर खेळायला गेलेली दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी एका ७ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस दुसऱ्या मुलाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
काय आहे नेमकी घटना? चाकूर शहरातील जुने महादेव मंदिर गल्ली भागात राहणारे साईचरण दिनेश स्वामी (वय १० वर्षे) आणि देवांश मंगेश स्वामी (वय ७ वर्षे) ही दोन मुले रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही मुले घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधा शोध सुरू केली. अखेर दुपारी या घटनेची माहिती चाकूर पोलिसांना देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, दुपारच्या सुमारास देवांश मंगेश स्वामी याचा मृतदेह चाकूर–उजळंब रस्त्यालगत असलेल्या एका मोकळ्या जागेत आढळून आला. एका निष्पाप बालकाचा अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
दुसरा मुलगा, साईचरण स्वामी, अद्याप बेपत्ता असल्याने पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून विविध कोनातून तपास सुरू आहे. देवांशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



