जगतज्योती महात्मा बसवेश्वर -आधुनिक युगातील तरुणाईचे दीपस्तंभ

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६
‘कायकावे कैलास’ (काम हेच कैलास आहे) हा मंत्र देणारे १२ व्या शतकातील महान क्रांतीकारक, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती केवळ एक उत्सव नसून, ती विचारांच्या परिवर्तनाची वेळ आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात भरकटलेल्या तरुणाईला महात्मा बसवेश्वरांचे विचार एक नवी दिशा देऊ शकतात.
आजचा युवक शॉर्टकटच्या शोधात असतो. पण महात्मा बसवेश्वरांनी शिकवले की, कोणतेही काम छोटे नसते. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. “तुमचे काम प्रामाणिकपणे करणे, हाच खरा देव आहे,” हा त्यांचा संदेश आजच्या ‘स्टार्टअप‘ आणि ‘करिअर‘च्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तरुणांनी केवळ फळाची अपेक्षा न करता कष्टावर निष्ठा ठेवली, तर प्रगतीचे कैलास गाठणे कठीण नाही.
हीच्या गप्पा मारतो, पण महात्मा बसवेश्वरांनी ९०० वर्षांपूर्वी ‘अनुभव मंटपा‘च्या माध्यमातून जगातील पहिली संसद स्थापन केली होती. जिथे जात, धर्म आणि लिंगाचा भेद न करता प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार होता. आजच्या तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना बसवेश्वरांच्या या‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा‘ आणि ‘समानतेचा‘ आदर्श समोर ठेवला पाहिजे. द्वेष पसरवण्यापेक्षा संवादसाधणे हीच खरी क्रांती आहे.
“माझं काय?” या वृत्तीपेक्षा “समाजाचं काय?” हा विचार आजच्या काळात गरजेचा आहे. बसवेश्वरांनी‘दासोह‘ (सेवा) ही संकल्पना मांडली. आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करणे, हीच खरी माणुसकी आहे.
“नुडिडंते नडे” (जसे बोलतो, तसेच वागा) हा त्यांचा सर्वात मोठा संदेश होता. आज राजकारण असो वासमाजकारण, बोलणे आणि वागणे यात मोठी तफावत दिसते. तरुणांनी जर स्वतःच्या शब्दावर ठाम राहण्याची आणि तत्त्वाशी तडजोड न करण्याची वृत्ती जोपासली, तर एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो.
महात्मा बसवेश्वर हे केवळ एका धर्माचे किंवा पंथाचे नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे होते. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमते विरुद्ध आवाज उठवला. आजच्या युवकांसाठी ते केवळ इतिहासातील एक नावनसून, प्रगतीचा ‘रोडमॅप‘ आहेत. त्यांच्या ‘वचनां‘मधील तत्वज्ञान आत्मसात करणे हीच त्यांना खरीआदरांजली ठरेल.
भाई आसद बल्खी
संपादक,
श्रमिक एकता न्यूज



