“कलेक्टरांची कारवाई नांदेड शहरपुरतीच का? मुखेडमध्ये रेती माफियांना प्रशासनाचे अभय!”

▫️“तक्रारी, बातम्या सगळे व्यर्थ; मुखेडमध्ये रेती माफिया बेधडक”
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६
नांदेड जिल्ह्यात अवैध रेती तस्करीवर जिल्हाधिकारी यांनी शहरात कडक कारवाई सुरू केली असली, तरी मुखेड तालुक्यात मात्र रेती माफियांना जणू मोकळे रान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज तब्बल ३० ते ४० हायवा गाड्या अवैध रेती घेऊन थेट तहसील कार्यालया समोरून जात असल्याचे उघडपणे दिसत असताना देखील प्रशासन मात्र गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांकडून वारंवार तक्रारी व बातम्या प्रसिद्ध करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणाऱ्या, नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्या तसेच एकाच पावतीवर दोन- दोन वेळेस वाळू वाहतूक करणाऱ्या रेती वाहतूक सुरू असताना देखील महसूल व पोलिस प्रशासनाचा संशयास्पद कानाडोळा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करून ती हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालया समोरूनच या गाड्या रोज सर्रास जात असल्याने प्रशासनाला याची माहिती नसावी, असे म्हणणे अवघड असल्याचे नागरिक सांगत आहेत.

जर नांदेड शहरात अवैध रेती तस्करीवर कठोर कारवाई होऊ शकते, तर मुखेडमध्ये रेती माफियांवर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन मुखेड मधील अवैध रेती तस्करीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.



