देगलूरमध्ये अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवर कारवाई

▫️चार आरोपींवर गुन्हा दाखल; ₹७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रमिक एकता न्यूज़ देगलूर : ०५ सप्टेंबर २६
जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत, देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ₹७,५८,६०० चामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, नरंगल रोडवरील मोहम्मद जाकेर शेख यांच्या घरामागील मोकळ्या जागेत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ वाहनांद्वारे विक्रीसाठी नेले जात आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाई दरम्यान अंदाजे ₹५ लाख किमतीची एक ETIOS कार (MH-12 GZ 2345) आणि त्यातून ₹२६,२६० किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याशिवाय अंदाजे ₹२ लाख किमतीचा एक ऑटो (MH-26 G 2298) आणि त्यातून ₹१७,८६० चा प्रतिबंधित माल मिळून आला.
याच कारवाईत, हणमंत विठ्ठल थडके यांच्या ‘नरेंद्र मिल्क डेअरी‘ या दुकानातून ₹५,७०० आणि अशोकलक्ष्मण कोंडेवाड यांच्याकडील एका पोत्यातून ₹४,५८० चा गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी सय्यद मसीयोद्दीन उर्फ बबलू सय्यद रियाजोद्दीन (वय २५), शेख सलमान शेख जानी (वय२१), हणमंत विठ्ठल थडके (वय ५०) आणि अशोक लक्ष्मण कोंडेवाड (वय अंदाजे २८) यांच्याविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्नसुरक्षा व मानके कायद्याच्या संबंधित कलमां नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी किरण पोपळघट आणि प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्यासह देगलूर पोलिसांच्या पथकाने केली.
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.




