लातूरमध्ये NEET पेपर फुटीचे पडसाद; नामांकित क्लासेसवर संशयाची सुई, पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश

लातूर प्रतिनिधी:- १३ मे २०२६
NEET (UG)-2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील खाजगी क्लासेस पर्यंत पोहोचल्याची शक्यता निर्माण झालीआहे. एका पालकाने दिलेल्या खळबळ जनक तक्रारीनंतर लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनीया प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
आज दिनांक १२ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी प्रत्यक्षहजर राहून तक्रार नोंदवली. त्यांच्या दाव्यानुसार, लातूरमधील एका नामांकित कोचिंग क्लासेसने परीक्षेपूर्वी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक ‘मॉक टेस्ट‘ (सराव परीक्षा) घेतली होती. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या NEET (UG)-2026 च्या मुख्य परीक्षेत या मॉक टेस्ट मधील तब्बल ४२ प्रश्नजसेच्या तसे आले होते.
NEET परीक्षा पेपर फुटीमुळे आधीच रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सदर क्लासेसचा यापेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना या अर्जाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, लातूर जिल्ह्यात NEET (UG)-2026 पेपर फुटीच्यासंदर्भात कोणाकडेही काही महत्त्वाची माहिती, ऑडिओ–व्हिडिओ क्लिप किंवा अन्य पुरावे असल्यास त्यांनी घाबरून न जाता पुढे यावे.
संपर्क: समीरसिंह साळवे (उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर) भ्रमणध्वनी: ९१४५११९०४९
या प्रकरणाच्या चौकशीमुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ‘एज्युकेशनहब‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



