राजकीय

मुखेड तहसील कार्यालयावर भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांचा उद्या भव्य ‘एल्गार मोर्चा.

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : १९ ऑगस्ट २६

भूमीहीनांना हक्काची जमीन मिळावी, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान मजदुर सभेच्या वतीने गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी मुखेड तहसील कार्यालयावर भव्य ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे चौक, बारहाळी नाका येथून सकाळी ११.३० वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.

देशाच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली असली तरी अद्यापही तळागाळातील भूमिहीन, शेतमजूर, भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही. गरिबांच्या हक्काची गायरान, देवस्थान व वनजमीन त्यांना मिळालेली नाही, तर दुसरीकडे भांडवलशाही धोरणांमुळे संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या मोर्चाद्वारे प्रशासनासमोर अनेक प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला ५ एकर (२ हेक्टर) जमिनीचे वाटप करून सातबारावर (७/१२) मालकी हक्काची नोंद करावी, तसेच गायरान जमीन कसणाऱ्यांना तत्काळ पट्टे देऊन त्यांना जमिनीचा ताबा द्यावा, या मुख्य मागणीचा समावेश आहे. यासोबतच शेतीमालाला MPS प्रमाणे निश्चित भाववाढ मिळावी आणि शेतीपंपासाठी २४ तास थ्री-फेज वीज मोफत पुरवण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

ऊसतोड कामगारांची नोंदणी करून स्थलांतरापूर्वी प्रति कोयता १ लाख रुपये अनुदान व प्रती टन १००० रुपये मजुरी द्यावी, तसेच त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा लागू करावा, याकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे. महिला बचत गटांचे मायक्रो फायनान्स आणि शहरी बचत गटांचे कर्ज माफ करून त्यांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे; लेंडी प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन करून कुदराळा, हसनाळ, चांडोळा आदी तलावांत सोडावे; मन्याड नदीचे खोलीकरण व सरळीकरण करावे; रोजगार हमी योजनेअंतर्गत ३६५ दिवस काम द्यावे; घरकुलाचे प्रलंबित अनुदान तत्काळ देऊन प्रतिघरकुल ५ लाख रुपये द्यावेत आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी पेन्शन योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले जाणार आहे.

या एल्गार मोर्चामध्ये मुखेड तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. पी. डी. वासमवार, कॉ. अशोक घायाळे, कॉ. संदीप जाधव, कॉ. दिलीप पाटील यांच्यासह अखिल भारतीय किसान मजदुर सभेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button