क्राईम

राजुरा-गोनेगाव मार्गावर अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट; विनाक्रमांक ‘हायवा’ गाड्यांद्वारे लूट, महसूल व पोलीस प्रशासन झोपेत?

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १६ सप्टेंबर २६

मुखेड तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यांना आता कायद्याचे कोणतेही भयउरले नसल्याचे विदारक चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून राजुरा बु. – आंबुलगा बु. – ईटग्याळ – गोनेगाव या मार्गावर भल्या पहाटे ओव्हरलोड आणि अवैध वाळूची राजरोसपणे तस्करी सुरू आहे. 

दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत अंधाराचा फायदा घेत, पुढे आणि मागे कोणतीही नंबरप्लेट नसलेल्या ५ मोठ्याअवजड ‘हायवा‘ वाहनांमधून ही वाळू वाहतूक अत्यंत सुसाट वेगाने केली जात आहे. वाहनांवर नंबरप्लेट नसणे हा थेट नियमांचा भंग असूनही हे माफिया निर्ढावलेल्यापणे रस्त्यावरून गाड्या पळवत आहेत. मात्र, या अत्यंत गंभीर प्रकाराकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाने सोयीस्कररीत्या डोळेझाक केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांवर क्षुल्लक कारणांवरून कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस आणि महसूल अधिकारी या वाळू माफियांसमोर हतबल झाले आहेत का, की यामागे प्रशासनाचे आणि वाळू माफियांचे काही आर्थिक संगनमत आहे, असा संतप्त सवालपरिसरातील नागरिक विचारत आहेत. 

या बेकायदेशीर वाळू उपशामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, ओव्हरलोड गाड्यांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही अक्षरशः चाळण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन या मार्गावर धडक कारवाई करावी आणि वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button