राजकीय

घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १५ सप्टेंबर २६

तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत.

या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले.

गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button