विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची नांदेड पोलीस अधीक्षक यांच्यासोबत समन्वय बैठक संपन्न

नांदेड – विभागीय रेल्वे व्यवस्थापक,निती सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सोबत रेल्वेच्या विविध सुरक्षा विषयक प्रश्नांबाबत समन्वय बैठक संपन्न झाली. यावेळी राजेंद्र कुमार मीना अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सूरज गुरव, पोलीस उप अधिक्षक, महाराष्ट्र पोलिसांचे इतर अधिकारी, लोहमार्ग पोलीस आणि इतर रेल्वे अधिकारी यांची उपस्थिती होती.
सदर बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या घटना, प्रवाशांच्या सामानाची चोरी, दगडफेक आणि अनुचित प्रकार आदी विषयांची महीती विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण दल नांदेड चे अमित मिश्रा यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सरकारी रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयाने स्थानिक गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनेबद्दल चर्चा झाली. असुरक्षित भागात विशेष पाळत/गोपनीय नजर ठेवली जाते. केबल कटिंग, गुन्हेगारांच्या टोळ्या पकडणे आदी प्रकरणे शोधून ते नियंत्रणात आणण्यासाठी पोस्ट स्तरावर सर्व पोस्ट प्रभारींना विशेष पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण आणि जमीन बळकावण्याच्या प्रयत्नांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशा बाबींना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या टीमला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ च्या तरतुदींसह, विशेषत: बालवयीन मुलांशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी अवलंबल्या जाणार्या कार्यपद्धती स्पष्ट केल्या. गुन्हेगारी प्रकरणे कमी करण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी एनजीओच्या समन्वयाने आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांद्वारे संयुक्त जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीचे आयोजन विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अमित मिश्रा यांनी केले होते.



