Uncategorized

आरक्षण म्हणजे बळी तो कान पिळी – भरत विटकर


नांदेड – सद्या आरक्षण म्हणजे बळी तो कान पिळी असे चित्र तयार झाले आहे यामध्ये विमुक्त जमातींच्या हक्काचे आरक्षण लुप्त होत असून विमुक्त जमातींना हक्काचे मिळालेले आरक्षण टिकवायचे असेल तर विमुक्त जमाती ओबीसी प्रवर्गामधून वेगळ्या करण्याची गरज आहे अशी मागणी विशेष मुक्त लोक अधिकार मोर्चाचे अध्यक्ष भरत विटकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
नागपूर येथे होत असलेल्या अधिवेशनामध्ये विमुक्त जामातींच्या आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर ते नागपूर अशी जनजागृती रॅली नांदेड येथून जात असताना नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना भरत विटकर म्हनाले की, मराठा समाज ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणात घुसण्यासाठी सुनामी घेऊन आला आहे. त्यामुळे आरक्षण म्हणजे बळी तो कान पिळी अशी अवस्था झाली आहे. विमुक्त जमाती ह्या ओबीसी नाहीत, विमुक्त जमाती हा प्रवर्ग ब्रिटिश काळापासून स्वतंत्र ओळखला जाणारा प्रवर्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणात अनेक ठिकाणी विमुक्त जमातीचे स्वतंत्र प्रवर्ग असल्याचे नमूद करून त्यांचे विदारक वास्तव त्यांच्या लोकसंख्येसह मांडलेले आहे.
१९५५ ला नेमलेल्या काका कालेलकर आयोगामधील एक सदस्य एल.आर. नाईक यांनी एक स्वतंत्र नोट लिहून विमुक्त जमाती अतिशूद्र समजलेला वेगळा प्रवर्ग असल्याचे नमूद केलेला आहे. १९६१ साली नेमलेल्या थाडे समितीने अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केलेला आहे. या अहवालाच्या आधारे शासनाने विमुक्त जमाती हा स्वतंत्र प्रवर्ग १९ नोव्हेंबर १९६१ पासुन घोषित केलेला आहे.
१९६४ ला नेमलेल्या बि.डी. देशमुख समितीने मागास वर्गीयांचे चार प्रवर्गा सुचविलेले आहेत. या शिफारशींच्या आधारे ९ एप्रिल १९६५ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण प्रवर्गनिहाय एसी-१३ टक्के, एसटी ७ टक्के, व्हिजेएनटी ४ टक्के, ओबीसी १० टक्के, आरक्षण ठेवले. या निर्णयामध्ये विमुक्त जमाती हा प्रवर्ग स्वतंत्र होता, तो ओबीसी प्रवर्ग नव्हता. १९६५ पासुन व्हिजेएनटी चा संपूर्ण अनुशेष गिळंकृत झाला. १९९२ पासून केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये देखील विमुक्त जमातींना ओबीसी म्हणून गृहीत धरल्याने केंद्र शासना मधील विमुक्त जमातीचे नोकरी मधील प्रमाण शून्याच्या बरोबर राहिलेले आहे.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही विमुक्त जमाती चोर गुन्हेगार असल्याचा दृष्टिकोन लोकांमधे दिसून येतो. अगदी ज्या ओबीसी मध्ये विमुक्त जमातींचा समावेश गृहीत धरलेला आहे, त्या ओबीसी लोकांचाही दृष्टिकोन तसाच असल्याचे दिसून येते. विमुक्त जमाती या चोर/गुन्हेगार असल्याचे सार्वजनिक ठिकाणी उल्लेख देखील होणाऱ्या घटना घडताना दिसून येतात. विमुक्त जमाती हा ब्रिटिश काळापासून स्वतंत्र प्रवर्ग म्हणून ओळखला जात होता, त्यांच्यासाठी ब्रिटिश सरकार स्वतंत्र तरतुदी करत होते. मात्र ब्रिटिशांपेक्षाही स्वतंत्र भारतातील शासनाचे विमुक्त जमातीकडे दुर्लक्ष झालेले आहे.
ब्रिटिश काळात अतिशूद्र ठरलेल्या विमुक्त जमातींचे आरक्षण शासनाने स्वतंत्र ठेवावे या मागणीसाठी आम्ही पुण्या पासुन महात्मा फुले यांना अभिवादन करुन पुढे कोल्हापूर येथे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करणार आहोत. ही जनजागृती रॅली १३ जिल्ह्यातून जाणारा आहे. नागपूर येथे १५ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शासनाला निवेदन सादर करणार असल्याचे भरत विटकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button