प्रशासनातील सुधारणांमध्ये पत्रकारांचे मोठे योगदान- महेश वडदकर

नांदेड प्रतिनिधी :- शासनाच्या विकास योजनांची अंमलबजावणी करून जनचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. यावेळी प्रशासनाकडून काही त्रुटी होत असल्यास पत्रकार त्या त्रुटींची जाणीव प्रशासनास करून देतात त्यामुळे जनतेपर्यंत सुविधा पोहोचविण्यास प्रशासनाला मदत मिळते म्हणून प्रशासनातील सुधारणांमध्ये पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे मत पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी व्यक्त केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि दर्पण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देताना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर बोलत होते. पेन, वही, लोकराज्य मासिक आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रपतवार, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, चारुदत्त चौधरी, अल्ताफ सानी, रमेश घोनसे पाटील, जैनुद्दीन पटेल रावणगावकर, प्रल्हाद कांबळे, मोहम्मद रफीख,अहेमद करखेलिकर,विजय निलंगेकर,गंगाधर गच्चे, सूर्यकुमार यन्नवार त्यासह अनेक पत्रकारांची परिस्थिती होती.
पुढे बोलताना उपजिल्हाधिकारी महेश वडदकर म्हणाले की, पत्रकारांनी समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावावा यामुळे प्रशासनासही मदत होईल आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राम तरटे यांनी केले.


