बारावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात, तालुक्यात ३६७० विद्यार्थी परीक्षा देणार

▪️एसटी महामंडळाच्या बस बंद असल्यामुळे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना प्रवाससाठी होणार त्रास
मुखेड प्रतिनिधी :- आसद बल्खी
उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी झाली असून कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे.त्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत. एचएससी बोर्डाची परीक्षा उद्यापासून सुरुवात होत असुन इंग्रजीच्या पेपरने परीक्षेची सुरुवात होत आहे. राज्यामध्ये लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि त्याच अनुषंगाने मुखेड तालुक्यातही एकूण दहा परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तालुक्यातील ३६७० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. परीक्षा पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कैलास होणधरने यांनी संपूर्ण तयारी केली असून एका शाळेची शिक्षक दुसऱ्या शाळेवर पर्यवेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहेत..
प्रतीक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठे पथक तैनात करण्यात आले आहे त्याचप्रमाणे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे भरारी पथक तैनात करण्यात आली आहे प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे .प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. बैठे पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असणार आहे तर गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचेही एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. अशी माहिती कैलास होणधरने यांनी दिली. दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचा गैर प्रकार करु नये, ताणतणाव न घेता अगदी प्रसन्न मनाने परीक्षा द्यावी,असे आवाहनही कैलास होणधरने यांनी केले आहे.



