प्रभारी राजच्या विळख्यात मुखेड तालुका; विकासाचा गाडा रुतला;एकाच खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या
मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६
नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या मुखेड तालुक्यात सध्या प्रशासकीय अनागोंदीचा कळस गाठला गेला आहे. अनेक महत्त्वाच्या विभागांमधील प्रमुख पदे रिक्त असल्याने ‘प्रभारी राज‘ सुरू झाले असून, याचा थेट फटका तालुक्यातील विकासकामांना आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहींची बदली झाली आहे. ही रिक्त पदे भरण्या ऐवजी शासनाने उपलब्ध अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त पदभार सोपवला आहे. आधीच एका विभागाचा डोलारा सांभाळताना दमछाक होत असलेल्या अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या कार्यालयाची सूत्रे दिल्याने कोणत्याही एका विभागाला पूर्ण न्याय देता येत नाहीये. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता धोक्यात आली असून तातडीच्या निर्णयांना विलंब होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकमेव १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आहे, मात्र येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने आरोग्यव्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असताना पूर्णवेळ अधीक्षकाची गरज आहे.
तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बियाणे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे.
मुखेड नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. देगलूरच्या मुख्याधिकाऱ्यांकडे येथील अतिरिक्त पदभार असल्याने स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत.
कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यात १३०ग्रामपंचायती आणि १३५ महसुली गावांचा विस्तार आहे. अशा मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी सक्षम प्रशासनाची गरज असताना प्रभारी अधिकाऱ्यांमुळे विकासकामांना मोठी ‘खीळ‘ बसली आहे.
“प्रशासनाने तातडीने मुखेड तालुक्याचा गांभीर्याने विचार करून रिक्त पदांवर कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी,” अशी आग्रही मागणी आता मुखेडच्या जनतेतून आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. अन्यथा, आंदोलना शिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे



