टिईटी परीक्षा घोटाळ्यांविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचे आंदोलन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड : ०६ जुलै २६
‘नीट’ व ‘टीईटी’ परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ एसएफआय जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

एसएफआयने ‘नीट’ व ‘टीईटी’ प्रकरणातील नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन प्रवेश सुरू करावा, ‘टीईटी’ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, शैक्षणिक संस्थांमधील जादा फीविरोधात कारवाई करावी तसेच नांदेड शासकीय आयटीआय मुलांचे वसतिगृह तातडीने सुरू करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या.
मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसएफआयने दिला. आंदोलनात विजय लोहबंदे, मिना आरसे, पवन जगडमवार, डॉ. सचिन खडके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.



