मुखेड दुयम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; जादा पैसे घेतल्याशिवाय खरेदीखत होईना!

▫️पैसे न दिल्यास खोट्या त्रुटींचा बाऊ; पैशांची मागणी पूर्ण होताच खरेदीखत तत्काळ!
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड ०४ जुलै २६
खरेदी खत करण्यासाठी नियमा पेक्षा जास्त पैसे घेतल्या शिवाय मुखेड दुयम निबंधक कार्यालयात कोणतेही काम केले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांकडून नियमापेक्षा दुप्पट आणि तिप्पट पैसे उकळले जात असल्याच्या गंभीर तक्रारी असून, या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मार्फत सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड येथील दुयम निबंधक कार्यालयात खरेदी खतासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक नागरिकांना ‘नियमात नसलेल्या त्रुटी‘ सांगून तुमचे खरेदी खत होणार नाही असे सांगून अडवणूक करतात. मात्र, नागरिकांनी मागणीनुसार पैसे वाढवून दिले की, लगेचच त्याच त्रुटींकडे दुर्लक्ष करून खरेदी खत तत्काळ करून दिले जाते. दुयम निबंधक कार्यालयात हा प्रकार सर्रासपणे चालू असून सामान्य जनतेची मोठी लूट होत आहे.
दुयम निबंधक कार्यालयातील ही आर्थिक लूट आणि मनमानी कारभार त्वरित बंद झाला पाहिजे. यासंपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सहजिल्हा निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे.
या वेळी निवेदन देताना शेतकरी नेते शिवशंकर पाटील,माणिकराव गायकवाड ,मगदूम पठाण, बाळू मेटकर, शफी कुरेशी यांच्यासह इतर अनेक नागरिक उपस्थित होते.



