मुखेड मतदारसंघात अंदाजे ६० टक्के मतदान

भर उन्हात ९० वर्षीय रहमतबी चांदसाब शेख यांनी मतदान केले.
लग्नाची दाट तिथी व कडक उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची चर्चा
मुखेड / प्रतिनिधी
मुखेड – कंधार विधानसभा मतदरसंघात दि.२६ एप्रिल रोजी ३६२ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजता मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. अनेक केंद्रांवर मतदान कर्मचाऱ्यांनी रांगेतील पहिल्या मतदाराचे स्वागत केले. बहुतेक केंद्रावर मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या. साधारण 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होती. मात्र उन्हाचा तडाखा बसताच मतदान केंद्रे ओस पडली. सकाळी गजबजाट असलेल्या केंद्रांवर दुपारी शुकशुकाट होता. उन्हं उतरल्यावर दुपारी चारच्या नंतर पुन्हा मतदान केंद्र गजबजली. मतदानाची वेळ संपून गेली तरी अनेक केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. मात्र उन्हाचा भर ओसरताच मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या. सायंकाळपर्यंत या मतदारसंघात अंदाजे ६० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.बाहेरगावाहून ईव्हीएम येण्यास विलंब होत असल्याने निश्चित आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
मुखेड मतदार संघात १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १६ रोजी ३६२ मतदान केंद्रावर मतदान झाले. सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. मतदार संघात २ लाख ९६ हजार ५१६ मतदार आहेत. लग्नाची दाट तिथी व कडक उन्हामुळे हे झाले असावे अशी चर्चा आहे तसेच मतदारसंघातील हजारो मतदार रोजगारासाठी स्थलांतर झाले. त्यामुळे अंदाजे ६० टक्के मतदान झाले असावे असे सांगण्यात आले. शहरात सरस्वती शिशु मंदिर शाळा येथे मतदान केंद्रावर मतदान मशीन बंद पडली होती. त्यामुळे काही वेळ मतदान थांबले होते. दुरुस्त करुन पुन्हा मतदान सुरु झाले. आ. डॉ. तुषार राठोड यांनी वसंतनगर येथे मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान केल. आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी होनवडज येथे मतदान केले. सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजेश जाधव सहकाऱ्यांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



