क्राईम

विष्णूपुरीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला; एनडीआरएफ पोहोचण्यापूर्वीच जीवरक्षकांचा शोध

 श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- २१ सप्टेंबर २६

येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा रविवारी दुपारी विष्णूपुरी येथील काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एका तरुणाचामृतदेह रविवारी सायंकाळीच सापडला होता, तर बेपत्ता असलेला दुसरा तरुण दीपक सोळंके याचा मृतदेह आज, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शोधण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील किनी येथील बजरंग बिरू येडुरे (वय १८) आणि मुखेड तालुक्यातील बाहाळी येथील दीपक मारुती सोळंके (वय १८) हे दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. रविवारी श्री गणेश विसर्जनासाठी काळेश्वर घाट परिसरात आले असताना ते गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहात वाहून गेले आणि बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व जीवरक्षक दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी सायंकाळी उशिरा जीवरक्षक दलाने बजरंग येडुरे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला; मात्र अंधारपडल्याने दीपक सोळंकेचा शोध थांबवावा लागला होता.

दीपकच्या शोधासाठी आज, सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच जीवरक्षक पथकाने पुन्हा मोहीम सुरूकेली. तीन–चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही मृतदेह न सापडल्याने प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. मात्र, एनडीआरएफची चमू घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, सकाळी १० वाजेच्या सुमारास स्थानिक जीवरक्षक दलाने दीपकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

दीपकचे नातेवाईक रविवारी रात्री पासूनच काळेश्वर घाटावर थांबले होते. त्याचा मृतदेह हाती लागताच कुटुंबीय आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. सकाळी साडेदहा वाजता दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे किनी आणि बाहाळी गावांसह महाविद्यालयीन वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button