शेकोट्या पेटल्या;शहरासह तालुक्यातील भागात थंडी वाढली

राजकीय वातावरण तापले!
मुखेड प्रतिनिधी:-
थंडीने मुखेड शहरासह तालुक्यात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी हातरुण परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडले परिसरात गारठा कायम आहे. थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागली आहे.
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे शहरात शेकोट्या समोर बसलेले नागरिक दिसून येत आहे. ग्रामीण भागात घरासमोर व शेतात शेकोट्या पेटू लागल्या आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी उलन कपड्याचा वापर करणे सुरू केले. दिवसभर थंडी जाणवत लागल्याने शहरातील रस्त्यांवर स्वेटर, जॉकेट आदी गरम कपडे परिधान केलेले नागरिक दिसून येत आहे. ‘मार्निेंग वॉक’साठी निघणार्या नागरिकांची संख्याही या थंडीच्या कडाक्याने रोडावली आहे.
सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहेत. लहान बालक व वृद्ध नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे उपजिल्हा रुग्णांलय व खासगी रुग्णांलयात उपचारासाठी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.
राजकीय वातावरण तापले!
विधानसभा व मुखेड लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे पेटलेल्या शेकोट्यांवर राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. या निवडणुकीसाठी युवावर्ग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे



