हिमायतनगर :वादग्रस्त इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून पोलिसांत तक्रार

हिमायतनगर प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर
दि. २७ सप्टेंबर रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशनला सय्यद अब्दुल अजिम (वय ३८, व्यवसाय-इलेक्ट्रीशियन, रा. बाजार चौक, हिमायतनगर) यांनी तक्रार दिली आहे की, hindu_ganesh_s नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून समाजात द्वेष निर्माण करणारी पोस्ट टाकण्यात आली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास १० वाजता त्यांचा मित्र तबरेज खान याने फोन करून माहिती दिली की, वरील अकाऊंटवरून हिमायतनगर शहरातील राहूल कारमोड याच्या छायाचित्रावर “लांड्यांचा बाप” असा एडिट केलेला मजकूर टाकत स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर तक्रारदाराने तत्काळ त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि आपल्या मित्रांना माहिती दिली.
तक्रारदाराचा आरोप आहे की या पोस्टमुळे मुस्लिम समाजाच्या मनात द्वेषाची भावना निर्माण झाली असून समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते मित्रांसह पोलीस ठाण्यात दाखल होऊन नमूद अकाऊंट धारका विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणी पोलीसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, सदर अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले.



