सामाजिक

मुखेड येथे पोस्ट ऑफिसची हक्काची इमारत उभारण्याची डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी केली मागणी


मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६
मुखेड शहरात अनेक वर्षांपासून पोस्ट ऑफिसची हक्काची जागा पडीक असून,सध्या हे कार्यालय एका खासगी इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे.यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असून,केंद्र शासनाने तात्काळ या जागेवर भव्य इमारत उभी करावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुखेड शहराच्या मध्यवर्ती भागात पोस्ट ऑफिसच्या मालकीची स्वतःची रिकामी जागा उपलब्ध आहे.मात्र,प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे.सध्या पोस्ट ऑफिस भाड्याच्या इमारतीत मोंढा भागात दुसऱ्या मजल्यावर चालवले जात आहे.
पोस्ट ऑफिसमधील बहुतांश कामे ही केंद्र सरकारच्या विविध योजना,पेन्शन आणि बचतीशी संबंधित असतात.त्यामुळे दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक,वृद्ध आणि महिला या ठिकाणी येतात.मात्र,कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने पायऱ्या चढून जाताना वृद्धांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.अनेक रुग्णांना आणि वृद्धांना तर दुसऱ्या मजल्यावर जाणेही शक्य होत नाही
मुखेड तालुक्यातील जनतेची आणि ज्येष्ठ नागरिकांची ही हक्काची मागणी लक्षात घेऊन,खासदारांनी केंद्र सरकारकडे वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करावा.तसेच पडून असलेल्या शासकीय जागेवर पोस्ट ऑफिसची सुसज्ज इमारत लवकरात लवकर मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी नम्र विनंती डॉ.श्रावण रॅंपनवाड यांनी या निवेदनातून केली आहे.या मागणीमुळे आता मुखेड मधील पोस्ट ऑफिसच्या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button