मुखेडच्या पीएमश्री शाळेसमोर अस्वच्छतेचे साम्राज्य; राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाची कारवाईला बगल.

▫️शाळेच्या दारात मटणाची दुकाने, आजी माजी नगरसेवक व नेत्यांना मिळतोय भाड्याचा मलिदा
▫️१३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम; उपोषणाचा इशारा
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०३ जुलै २६
शहरातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल‘च्या परिसरात सध्या अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शाळेच्या आवारात चिकन–मटनच्या दुकानांमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेष आणि अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची आणि आरोग्याची जबाबदारी आहे, त्या स्थानिक काही आजी माजी नगरसेवक आणि राजकीय नेत्यांनीच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या जागा चक्क भाड्याने दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे “कारवाई करणार कोण आणि कशी?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

या हायस्कूलमध्ये सुमारे १५०० विद्यार्थिनी शिक्षण घेतात. तसेच जवळच लहान मुलांची अंगणवाडी आहे. या वर्गांसमोरच असलेल्या चिकन–मटनच्या दुकानांमधून दररोज सांडपाणी, रक्त आणि प्राण्यांचे अवशेष थेट शाळेच्या मैदानात सोडले जात आहेत. या भयानक दुर्गंधीमुळे विद्यार्थिनी, लहान बालके आणि शिक्षकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. संसर्गजन्य आजारांचा मोठा धोका निर्माण झाला असूनही प्रशासन मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.

मुख्याधिकारी, महसूल विभाग आणि पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत, याचे खरेकारण आता उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटण्यासाठी स्थानिक आजी माजी नगरसेवक आणि काही बड्या राजकीय पुढाऱ्यांनीच ‘आशीर्वाद‘ दिला आहे. एवढेच नव्हे, तर या अतिक्रमित जागा त्यांनी दुकानदारांना भाड्याने (किरायाने) दिल्या आहेत. दर महिन्याला राजकीय नेत्यांच्या खिशात भाड्याची मोठी रक्कम जात असल्याने, स्थानिक प्रशासन यावर कारवाई करण्यास घाबरत आहे. पैशांच्या लालसेपोटी हे नेते चिमुकल्या विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळत आहेत.

या गंभीर आणि संतापजनक प्रकारा विरोधात ‘मास संघटने‘चे मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून, शाळेच्या परिसरातील ही चिकन–मटनची दुकाने आणि अतिक्रमण तत्काळ न हटवल्यास १३ जुलै रोजी साखळी उपोषण करण्याचा कडक इशारा दिला आहे.

आता या प्रकरणात मुख्याधिकारी कांबळे मॅडम, नगराध्यक्षा सौ. देबडवार आणि इतर जबाबदार नगरसेवक काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य महत्त्वाचे की राजकीय नेत्यांना मिळणारे बेकायदा ‘भाडे‘ महत्त्वाचे? हे आता प्रशासनाने कृतीतून सिद्ध करावे, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.



