मुखेड बाजार समितीच्या सभापतीपदी जीवनराव नाईक, तर उपसभापतीपदी शिवाजीराव बोडके यांची बिनविरोध निवड

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड | प्रतिनिधी: २८ नोव्हेंबर २६
मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जीवनराव नाईक (ईटग्याळकर) यांची बिनविरोध निवड झाली असून, उपसभापतीपदी शिवाजीराव नाना बोडके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासोबत निष्ठेने कार्य करणारे जीवनराव नाईक हे त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्षसंघटना आणि सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत त्यांना सभापतीपदाची जबाबदारी मिळाली असून, सर्वसामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हेच आमदार डॉ. राठोड यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. निवडीनंतर आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती जीवनराव नाईक आणि उपसभापती शिवाजीराव नाना बोडके यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, हीच आमच्या नेतृत्वाची भूमिका आहे; बाजार समितीचा कारभार अधिक सक्षम करून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू,” असा विश्वास आमदार डॉ. तुषार राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक, सक्षम आणि विकासाभिमुख होऊन शेतकऱ्यांच्या हिताला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



