डॉक्टरांचा आवाज विधानसभेत बुलंद करणारे नेते म्हणजे आ. डॉ. तुषार राठोड : डॉ. दिलीप पुंडे

▫️मुखेड येथे विविध वैद्यकीय संघटनांच्या वतीने आ. डॉ. तुषार राठोड यांचा भव्य सत्कार संपन्न; १०कोटींच्या निधीतून ‘डॉक्टर भवन‘ व ‘पत्रकार भवन‘ उभारण्याची ग्वाही
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २८ नोव्हेंबर २६
मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांना महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आय.एम.ए.) प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय विशेष पुरस्कार‘ प्राप्त झाल्या बद्दल, तसेच मुखेड आय.एम.ए. शाखेला ‘सर्वोत्तम लघु शाखा‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी मुखेड येथील नरसी रोडवरील वृंदावन गार्डन रेस्टॉरंट येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय संस्था, आय.एम.ए., निमा, आय.डी.ए. आणि हिमा (मुखेड) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड भूषण तथा सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे हे होते, तर सत्कारमूर्ती म्हणून आ. डॉ. तुषार राठोड उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. दिलीप पुंडे यांनी आ. तुषार राठोड आणि राठोड परिवाराच्या कार्याचे कौतुक करत, “आ. तुषार राठोड हे खऱ्या अर्थाने डॉक्टरांचा आवाज आहेत,” असे गौरवोद्गार काढले. ते पुढे म्हणाले की, “जगभरात दरवर्षी विषारीसापाच्या दंशामुळे एक लाखाहून अधिक मृत्यू होतात. ही संख्या कमी करण्यासाठी ठोस कृती आराखडा(ॲक्शन प्लॅन) तयार करण्याची सूचना मी आ. राठोड यांना केली होती. त्यांनी हा अत्यंत संवेदनशील विषय विधानसभेत अतिशय प्रभावीपणे मांडला आणि तो मंजूरही करून घेतला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आज भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्पदंशाला अधिकृतपणे‘सूचना देणे अनिवार्य असलेला आजार‘ (Notifiable Disease) म्हणून घोषित केले असून, या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण श्रेय आ. तुषार राठोड यांनाच जाते.”

सत्काराला उत्तर देताना आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले की, “वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्न मी विधानसभेच्या माध्यमातून सातत्याने लावून धरले आहेत. महाराष्ट्रात‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (नोंदणी आणि विनियमन) कायदा‘ लागू होणार होता. मात्र, जोपर्यंत शासन डॉक्टरांचे दावे व हरकती ऐकून घेत नाही, तोपर्यंत हा कायदा सभागृहात आणू नये, अशी आग्रही भूमिकाघेत आम्ही संबंधित मंत्र्यांवर दबाव आणला. परिणामी तो कायदा रद्द करण्यात आला असून, त्यात आवश्यक त्या सुधारणा करूनच तो राज्यात लागू करावा, अशी विनंती शासनाकडे केली आहे.
वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा जपणे, डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी अनुकूल वातावरण मिळवून देणे आणि आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करणे, यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.” तसेच, लवकरच १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन मुखेड येथे सुसज्ज ‘पत्रकार भवन‘, ‘डॉक्टरभवन‘ आणि ‘माजी सैनिक भवन‘ उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील घडामोडी निर्भीडपणे मांडणाऱ्या सर्व पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशांत खंडागळे यांनी केली. डॉ. कैलास पाटील, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. वीरभद्र हिमगिरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग श्रीरामे यांनी केले, तर आभार डॉ. नितीन आंबेकर यांनी मानले.पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



