मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा!

कॉम्रेड पवन जगडमवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क / नांदेड: १२ ऑक्टोबर
यंदा पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे मुखेड तालुक्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुखेड तालुका तातडीने ‘दुष्काळग्रस्त‘ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अंबुलगा बु. (ता. मुखेड) येथील विद्यार्थी कॉम्रेड पवन जगडमवार यांनी थेट नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत लक्षवेधी आंदोलन केले.
खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या भीषण आर्थिक टंचाईमुळे शेतकरी आपल्या मुलांची शाळा व महाविद्यालयांची हजारो रुपये फी भरू शकत नाहीत. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. यावास्तवाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कॉम्रेड पवन जगडमवार यांनी रस्त्यावर उतरून हा लढा पुकारला आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या. पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून संपूर्ण मुखेड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे.
आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांची १०० टक्के शैक्षणिक फी सरसकटमाफ करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी आणि पीक विम्याची रक्कम त्वरित खात्यात जमा करावी.
आगामी काळात तालुक्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
प्रशासनाने या अत्यंत संवेदनशील आणि रास्त मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत दिलासा न दिल्यास, येणाऱ्या काळात संपूर्ण तालुक्यात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलनछेडण्याचा इशारा कॉम्रेड पवन जगडमवार यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे महसूल व जिल्हाप्रशासनाचे लक्ष मुखेडच्या या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले असून, प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडेसर्वांचे लक्ष लागून आहे.



