मुखेड पालिकेचा माजी मुख्याधिकारी व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण लाच घेताना रंगेहात जेरबंद; बीड एसीबीची धडक कारवाई

▫️६ लाख ४० हजारांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ठोकल्या बेड्या!
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६
जालना जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार आणि उपसा करणाऱ्या व्यावसायिकांकडून दरमहा लाखोरुपयांची ‘मंथली‘ (मासिक हप्ता) उकळणाऱ्या अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याला बीडलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत.
विशेष म्हणजे, संशयित आरोपी विजय चव्हाण यापूर्वी मुखेड नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणूनही काही वर्षे कार्यरत होता. शासनाकडून दरमहा जवळपास १ लाख ३० हजार रुपयां पेक्षा अधिकचा घसघशीत पगार असतानाही, या वर्ग–१ च्या राजपत्रित अधिकाऱ्याने पैशांच्या हव्यासा पोटी केलेल्या या कारनाम्यामुळे संपूर्ण महसूल वर्तुळात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे ६ हायवा गाड्या असून, ते जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या परिसरातून अधिकृत व अनधिकृत वाळू उपसा तसेच वाहतुकीचा व्यवसाय करतात. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पोकलंड मशीन जप्त न करण्यासाठी आणि ६ हायवा गाड्या सुरळीत चालू देण्याच्या बदल्यात तहसीलदार विजय चव्हाण याने प्रतिमहिना तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले.

या संदर्भात २६ मे रोजीच लाचेचा सौदा झाला होता; मात्र नेमक्या त्याच काळात अंतरवाली सराटी येथेमराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू झाले. चव्हाण हा शासकीय कर्तव्यावर असल्याने आंदोलनाच्या संवेदनशील ठिकाणी व्यस्त होता, त्यामुळे त्याला त्यावेळी लाचस्वीकारता आली नाही. मात्र, आंदोलन संपताच गेल्या दोन दिवसां पासून त्याने तक्रारदाराकडे पैशांसाठी तीव्र तगादा लावून मानसिक त्रास देणे सुरू केले होते.
शनिवारी सकाळी तहसीलदार चव्हाण याने पुन्हा लाचेच्या रकमेची मागणी करत तक्रारदाराला थेट छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या ‘कासलीवाल मारव्हल सोसायटी‘ (रो हाऊस नंबर ११९) या आलिशान घरी पैसे घेऊन बोलावले. त्यानुसार तक्रारदार लाखांची रोकड आणि बीड एसीबीच्या पथकासह छत्रपती संभाजीनगरला पोहोचले.
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चव्हाण हा सोसायटीच्या मुख्य गेटबाहेर आला. तक्रारदाराने त्याच्याहातात ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची बॅग सुपूर्द करताच, तिथे सामान्य नागरिकांच्या वेशात सकाळपासून पाळत ठेवून दबा धरून बसलेल्या बीड ‘एसीबी‘च्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहातपकडले.
ही धडक कारवाई बीड ‘एसीबी‘चे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मुख्य नेतृत्वात अंमलदार मच्छिंद्र बीडकर, प्रदीप सुरवसे, अमोल खरसाडे आणि अंबादास पुरी यांच्या विशेष पथकानेअत्यंत कौशल्याने पार पाडली.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याला ताब्यात घेऊन एसीबीचे पथक तातडीने जालन्याकडे रवाना झाले असून, त्याच्या मुकुंदवाडी व सिडको परिसरातील मालमत्तांची आणि बँक खात्यांची झडती घेण्याचेकाम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, महसूल यंत्रणेतील या ‘मोठ्या माशावर‘ झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्येही कमालीची घबराट पसरली आहे.



