लोहा व देगलूर तालुक्यातील युवकांचा ‘शेकाप’मध्ये जाहीर प्रवेश भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेला नवेबळ

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :– २२ नोव्हेंबर २६
शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) विचारांवर विश्वास ठेवत नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि देगलूर तालुक्यातील अनेक तरुणांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केला. येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते भाई मोहन गुंड यांनी या सर्व नूतन सदस्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले.
या वेळी बोलताना भाई मोहन गुंड यांनी नूतन कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकरी, कष्टकरी आणि सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तरुणांच्या या प्रवेशामुळे लोहा व देगलूर तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असाविश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात भाई शशिकांत पटणे, भाई विठ्ठल भंडारवार, भाई इस्माईल खान पठाण, भाई जावेद शेख, गजानन मुळखेडे, प्रणव हनुमंते, सर्वज्ञ देशमुख, ॲड. संतोष रणजीरे, ॲड. निलेश मुंडे आणि करण पवळेयांनी शेतकरी कामगार पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यास शेकापच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई राजू पाटील सुरनर, भाई शुभम केंद्रे, देगलूरचे तालुका चिटणीस भाई वंकलवार, प्रभू भाई परमेश्वर सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



