मंडलापूर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन आणि संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न.

▫️दुष्काळामुळे बालाजी पाटील खतगावकर यांनी नाकारला सत्कार; रोजगारासह पाणीटंचाई दूर करण्याची दिली ग्वाही
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मंडलापूर /मुखेड १३ नोव्हेंबर २६
मौजे मंडलापूर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे खाजगी सचिव तथा एमएसआरडीसीचे (MSRDC) महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. मुखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मा. खतगावकर यांनी आपला सत्कार नाकारून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश दिला.
सकाळी ठीक ११:३० वाजता हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. बालाजी पाटील खतगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूलभूत अधिकार, आजचे युवक–युवती, नागरिक आणि आजचे प्रशासन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून दुःखावर मात करण्यासाठी मिळवलेल्या ज्ञानाचासंदर्भ देत त्यांनी उपस्थितांना प्रबोधन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. दुष्काळात जनतेला पाणीटंचाई भासू देणार नाही आणि अतिगरजू, गरीब लोकांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.” तसेच पालकांनी मुला–मुलींच्या शिक्षणावर जास्तीतजास्त खर्च करून त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘शिवसेना वरिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्त्वावर काम करतात,’ असेहीत्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याच्या वित्त विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक मा. उत्तम सोनकांबळे यांनी धम्म स्वीकार,प्रसार आणि आंबेडकरी चळवळीचे कार्य या विषयावर उपस्थितांनासविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेनेचे नांदेड उपजिल्हाप्रमुख प्रा. व्यंकटराव पाटील खतगावकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठराव सूर्यवंशी,ओंकार पाटील खतगावकर, डॉ. प्रकाश हसनाळकर, विश्वनाथ कोलमकर, इंगोले पाटील, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील मंडलापूरकर, मथुराबाई पुठ्ठेवाड, जनाबाई कांबळे, हनिफाबी शेख उंद्रीकर, मिराताई मुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच परभणीहून शाहीर भारत मुंजे आणि किशनराव बुद्धेवार हे विशेषत्वाने उपस्थित होते.

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे मुखेड तालुकाध्यक्ष श्रावण नरबागे मंडलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी संजय सोनकांबळे, पिराजी गवलवाड, विठ्ठलराव पाळेकर, संपत कुंभारे, विठ्ठल कांबळे, कालिदास शिंदे, गौतमशिंदे, माजी सरपंच दौलत गायकवाड, व्यंकटराव चांडोळकर, हणमंत जाहूर, भीमराव मेथीकर, दीपक वाघमारे,हणमंत सोनकांबळे, दयानंद उंद्रीकर, उमेश सोनकांबळे, माळेगावे पाटील, तुळशीराम पाटील, विठ्ठल पाटील, दारकू मोटरगेकर आणि तालुका सचिव रघुनाथ जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक श्रावण नरबागे यांनी केली. सूत्रसंचालन दयानंद सोनकांबळे यांनी केले तर शेषेराव सूर्यवंशी, राजू नरबागे,संतोष कांबळे आणि मुन्ना कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



