विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन;संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्साह

मुखेड प्रतिनिधी :- ०३ ऑक्टोबर
मुखेड – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी मुखेड शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…” या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. संघाच्या शंभर वर्षांच्या अखंड कार्याचा गौरव अभिमानाने साजरा करण्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने शिस्तबद्ध वेशभूषेत या संचलनात सहभागी झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महंत गुरूवर्य विशुद्धानंदजी महाराज, हाळदेकर मठ संस्थान, हाळदा (ता. कंधार) हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चंद्रकांत मार्तंड पत्की, नांदेड विभाग महाविद्यालयीन प्रमुख यांनी मार्गदर्शन करताना संघाच्या कार्याची परंपरा, राष्ट्रसेवा आणि समाज जागृतीची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला.

पथसंचलनास सुरुवात आर्य वैश्य मंगल कार्यालयातून करण्यात आली. त्यानंतर श्री बालवीर हनुमानमंदिर, श्री गणाचार्य मठ संस्थान, महादेव मंदिर, जुने पोलीस स्टेशन, डॉ. हेडगेवार चौक, बालाजी मंदिर, तेली पेठ हनुमान मंदिर, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा शहरातील प्रमुख मार्गावरूनहे संचलन पुढे सरकले. ठाम पावले टाकत, घोषणांचा गजर करत स्वयंसेवकांचे संचलन शहरातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अखेरीस तगलाईन मार्गे पुन्हा आर्य वैश्य मंगल कार्यालय येथे प्रतिज्ञा घेऊन या भव्य पथसंचलनाची सांगता करण्यात आली. व शस्त्रपूजन करण्यात आले.

संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात स्वयंसेवकांनी देशसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या विविधक्षेत्रात दिलेले निस्वार्थ योगदान अधोरेखित करण्यासाठी हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वयंसेवकांच्या अथक कार्यामुळे समाजात बंधुभाव, नैतिक मूल्ये आणि देशभक्ती अधिकदृढ होत असल्याचा संदेश या संचलनातून देण्यात आला.




