मुखेड नगरपालिकेत राजकीय भूकंप: भाजप-शिवसेनेचे ७ नगरसेवक वादाच्या भोवऱ्यात!

▫️काँग्रेस आक्रमक; अपात्रतेसाठी जिल्हाधिकारी आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
मुखेड (प्रतिनिधी): ०२ मार्च २६
मुखेड नगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या एकूण ७ नगरसेवकांनी बेकायदा मार्गाने निवडणूक जिंकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केला आहे.
मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशसरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी संबोधित केले. यावेळी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांची प्रमुख उपस्थिती होती
डॉ. रॅपनवाड यांनी सांगितले की सक्षम पुराव्यांसह या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी आता काँग्रेस रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढा देण्यास सज्ज झाली आहे ते ७ नगरसेवक कोण आहेत त्यांचे नाव मात्र सांगितले नाही लवकरच त्यांचे नाव प्रकाशित केले जाईल असेही ते म्हणाले

काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, भाजपचे ५ आणि शिवसेनेचे २ नगरसेवक विविध कारणांमुळे बेकायदा ठरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आले आहे:
दोनपेक्षा जास्त अपत्ये: निवडणूक नियमांचे उल्लंघन करून दोनपेक्षा जास्त अपत्ये असताना माहिती लपवणे.
खोटी जात प्रमाणपत्रे: आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणे.
अवैध बांधकामे: स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर अनधिकृत बांधकामे असणे.
शासकीय लाभाचे पद: पदाचा गैरवापर किंवा लाभाच्या पदावर कार्यरत असताना निवडणूक लढवणे.
खोटी माहिती: निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता किंवा इतर महत्त्वाची माहिती दडवून ठेवणे
काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, केवळ आरोप करून ते थांबणार नाहीत, तर प्रत्येक आरोपासाठी त्यांच्याकडे सक्षम पुरावे उपलब्ध आहेत. हे पुरावे जिल्हाधिकारी आणि शासनाकडे सादर केले जाणार असून, या सातही नगरसेवकांचे पद रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, शेकाप चे भाई आसद बल्खी यांच्यासह मुखेडचे सर्व पत्रकार उपस्थित होते.
“नगरपालिकेत सध्या आमचे सदस्य नसले, तरी आम्ही जनतेचा आवाज दाबून देणार नाही. चुकीच्यामार्गाने निवडून आलेल्या नगरसेवकांबाबत आम्ही निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी आणिन्यायपालिकेकडे धाव घेत आहोत. आगामी काळात काँग्रेस कार्यकर्ते सक्षम विरोधी पक्षाची भूमिकारस्त्यावर उतरून पार पाडतील.” — डॉ. श्रावण रॅपनवाड



