वनविभाग निष्क्रिय, लाकूड तस्कर सक्रिय; मुखेडमध्ये अवैध वृक्षतोड वाढली

▫️जंगलांची सर्रास कत्तल, वनविभाग मात्र ‘मूकदर्शक’
मुखेड प्रतिनिधी:- ०५ मार्च २६
मुखेड तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागमात्र अक्षरशः कोमात गेल्यासारखा निष्क्रिय दिसत आहे. वारंवार तक्रारी, बातम्या आणि स्थानिकनागरिकांचा आक्रोश असूनही या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मुखेड शहर सह तालुक्यातील बारहाळी, मुक्रमाबाद, जाहूर, राजूरा, आंबुलगा आणि ईडग्याल ही गावे कर्नाटक वतेलंगणा राज्याच्या सीमेच्या अगदी जवळ असल्यामुळे या भागात लाकूड तस्करांचा अक्षरशः धुमाकूळसुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दररोज सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टर व ट्रक भरून अवैधरीत्या तोडलेले लाकूड राज्यात तसेच परराज्यात विक्रीसाठी नेले जात आहे.
विशेष म्हणजे, या संदर्भात नागरिकांनी अनेकदा वनविभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या, तसेच स्थानिक माध्यमांमध्ये बातम्याही प्रकाशित झाल्या. मात्र तरीही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांचा प्रश्न असा आहे की, वनविभाग नेमका कोणाच्या दबावाखाली गप्प आहे? की काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच हा काळाबाजार बिनधास्तपणे सुरू आहे? जर तात्काळ कडक कारवाई झाली नाही तर पुढील काही वर्षांत या परिसरातील जंगलांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी वनमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा या निष्क्रिय मुखेड वनविभागा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



