‘सांगा तुमच्या पागल मित्राला, युद्ध नको बुद्ध हवा!’ गॅस दरवाढीवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर उपरोधिक प्रहार

▫️मुखेडमध्ये ‘फेकूदिन’ साजरा; नालीतील गॅसवर चहा बनवून मोदींच्या आश्वासनांची उडवली खिल्ली
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०२ एप्रिल २६
केंद्र सरकारने आज व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे २०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आणि १ एप्रिलच्या ‘एप्रिल फुल‘चे औचित्य साधून मुखेड काँग्रेसच्या वतीने मुखेड तहसील कार्यालया समोर अभिनव ‘फेकूदिन’आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क नालीतून गॅस काढून चहा बनवण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करून केंद्रसरकारच्या आश्वासनांची लक्तरे वेशीवर टांगली.
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नालीतून गॅस‘ काढण्याच्या विधानाचा उपरोधिक समाचार घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी तहसील समोरील मुख्य रस्त्यावरील नालीवर चूल मांडून चहा तयार केला आणि तोनागरिकांना वाटला. “कुठे गेले तुमचे अच्छे दिन?” असा सवाल करत काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.

यावेळी आंदोलनात इराण–इस्राईल आणि अमेरिकेच्या युद्धावरूनही केंद्राला लक्ष्य करण्यात आले. “सांगा आपल्या ‘पागल‘ मित्राला (ट्रम्पला)- युद्ध नको बुद्ध हवा, अस्त्र क्रांती नको, विश्वशांती हवी,” अशा आशयाचे मोठे बॅनर आंदोलनात झळकत होते. जागतिक युद्धामुळे भारतात महागाई वाढत असून, जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोदींनी आपले मित्र ट्रम्प यांना युद्ध थांबवण्याचासल्ला द्यावा, असे आवाहन तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी यावेळी केले.
या आंदोलनात शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई आसद बल्खी, ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे, राजुभाऊ बनसोडे, हाफिज पठाण, एम. आर. गोपनर, बालाजी वाडेकर, शिवाजी कांबळे, शिवाजी गायकवाड, ईमामभाई, सूर्यकांत पांचाळ यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत, ‘प्रतिकात्मक चहा‘ पिऊनगॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.



