शहर

संघर्षातून यशाला गवसणी: मुखेडच्या रिक्षाचालकाचा मुलगा आता होणार ‘खाकी’ वर्दीचा मानकरी!

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६

 जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाचे फळ काय असते, याचे जिवंत उदाहरण मुखेड शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील अहिल्याबाई होळकर नगर येथील रहिवासी असलेले व्यंकटेश माधव देवकत्ते यांची नुकतीच चंद्रपूर पोलीस दलात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.

व्यंकटेश यांचे वडील माधव कोंडीबा देवकत्ते हे शहरात दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर त्यांची आई सुविद्य यांनी मिस्त्री कामात मजुरी करून व्यंकटेशच्या शिक्षणासाठी खंबीर साथ दिली. “आपण कष्ट सोसले तरी चालतील, पण मुलांच्या नशिबी मजुरी येऊ नये,” या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या माता-पित्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

व्यंकटेशने आपल्या आई-वडिलांच्या घामाची किंमत ओळखून अभ्यासात आणि मैदानी चाचणीत सातत्य ठेवले. पोलीस भरती प्रक्रियेत त्याने अथक परिश्रम घेतले आणि अखेर चंद्रपूर पोलीस दलात आपली जागा निश्चित केली. मजुरी करणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून व्यंकटेशने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

सध्या मुखेड शहरासह अहिल्याबाई होळकर नगर परिसरात आनंदाचे वातावरण असून, व्यंकटेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button