ईव्हीएम, सक्तीची वसुली आणि वीजतोडणी विरोधात काँग्रेसची ‘महागर्जना’; हिमायतनगर तहसीलवर धडक मोर्चा

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क हिमायतनगर: २९ ऑक्टोंबर २६
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आणि हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे नेते मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तहसील कार्यालयावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या विरोधात कथित ईव्हीएम व्होट चोरी प्रकरणी जोरदार आवाज उठवण्यात आला. यासोबतच, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, थकीत बिलांच्यानावाखाली केली जाणारी वीजतोडणी त्वरित बंद करावी आणि पैनगंगा नदी व कॅनॉलसाठी इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडावे, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या.

या धडक मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्षवेधण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, हिमायतनगरचे नगराध्यक्ष रफीक शेठ यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते,शेतकरी आणि स्थानिकनागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



