मुखेड, देगलूरहून येणाऱ्या ज्येष्ठांची नांदेड पोस्टात गैरसोय; बसण्यासाठी जागा नाही, कामातही दिरंगाई!

▫️ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटरची मागणी.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :– १८ नोव्हेंबर २६
शहरातील शिवाजी पुतळ्याजवळील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सध्या भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी आणि स्वतःच्या खात्यातील हक्काचे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या याढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये दैनंदिन कामासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते, मात्र त्या तुलनेत येथे बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातच येथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कामातील दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांच्या असहकार्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या सर्व गैरसोयींचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. मुखेड, देगलूरसह जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागांतून वयोवृद्ध नागरिक पोस्टाच्या कामासाठी नांदेडच्या मुख्य कार्यालयात येतात. शारीरिकव्याधी असतानाही त्यांना तासन्तास ताटकळत उभे ठेवले जात असल्याने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकदा लांबून आलेल्या या नागरिकांना काम न होताच आल्या पावली परतावे लागते.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी केवायसी व पैसे काढण्यासाठी स्वतंत्र आणि जलद काऊंटर सुरू करावेत.
लांबून येणाऱ्या ग्राहकांसाठी आणि वयोवृद्धांसाठी पुरेशा खुर्च्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागून कामाचा निपटारा जलद गतीने करावा.
पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाढत्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन नागरिकांची होणारीगैरसोय दूर करावी आणि तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्यांमधूनकेली जात आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास तीव्र नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.



