शहर

मुखेडचे शासकीय धान्य गोदाम बनले उघडी मुतारी; गोरगरिबांच्या घासाला दुर्गंधीचा विळखा

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- ०८ नोव्हेंबर २६

एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत‘चा नारा देत आहे, तर दुसरीकडे मुखेड येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामाला अक्षरशः सार्वजनिक मुतारीचे स्वरूप आले आहे. ज्या पवित्र गोदामातून तालुक्यातील हजारो गोरगरिबांच्या ताटात जाणारे अन्नधान्य साठवले जाते, तिथेच सर्वत्र अस्वच्छता आणि लघवीची दुर्गंधी पसरल्याने प्रशासनाच्या निर्ढावलेल्या कारभारा विषयी तीव्र संताप व्यक्त केलाजात आहे.

मुखेड येथील या शासकीय गोदामातून तालुक्याभरातील रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत या परिसराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गोदामाच्या आजूबाजूला आणि चक्क धान्याच्या पोत्यां जवळ लोकांनी अघोषित मुतारी बनवली आहे. परिसरात प्रचंड घाण आणि उग्र दर्पपसरला असून, याच किळसवाण्या आणि रोगराईच्या विळख्यात गोरगरिबांच्या ताटात जाणारे गहू आणि तांदूळ ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लाखो रुपयांचे कंत्राट घेणारे ठेकेदार याच परिसरात वावरत असतानाही त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का?असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

“अन्न हे पूर्णब्रह्म” मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत गरिबांच्या हक्काच्या अन्नाची अशी भयंकर विटंबना खळबळ जनक आहे. ज्या धान्यातून गोरगरिबांची आणि त्यांच्या लेकराबाळांची भूक भागवली जाते, तेचधान्य अशा रोगराई पसरवणाऱ्या वातावरणात ठेवले जात असल्याने गरिबांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे. येथे काम करणारे हमाल आणि धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना नाकाला रुमाल बांधूनचया परिसरात उभे राहावे लागते.

तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकांनी या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन गोदामाची स्वच्छता करावी, तसेच गोदामाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना कराव्यात. गरिबांच्या अन्नाची विटंबना थांबवली नाही, तर प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button