‘शाळा वाचवा, शाळा सुधारा’: झेडपी शाळांच्या दुर्दशेविरोधात SFI-DYFI आक्रमक, नांदेडमध्ये बेमुदत धरणे सुरू!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: १ सप्टेंबर २६
जिल्हा परिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उडालेला बोजवारा याविरोधात विद्यार्थी आणि युवक संघटना आता तीव्र आक्रमक झाल्या आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शाळा सुधारा‘ या मोहिमे अंतर्गत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आज पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जि. प. शाळांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः वाऱ्यावर आहे. या ढिसाळ कारभाराचा जाब विचारत, विद्यार्थ्यांना तत्काळ दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेआहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी विरोधात पुकारण्यात आलेल्या या बेमुदत आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष विजय लोहबंदे, मीना आरसे, पवन जगडमवार, शाम सरोदे, प्रफुलकऊडकर, जयराज गायकवाड आणि साहेबराव सोनसळे हे करत आहेत. तसेच, उज्ज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
प्रशासनाने या रास्त मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्रकेले जाईल, अशी स्पष्ट भूमिका संघटनांनी मांडली आहे. आता नांदेडचे जिल्हा प्रशासन यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



