मुखेड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; ७६ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : ०८ सप्टेंबर २६
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने मुखेड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तालुक्यात आतापर्यंत केवळ ५०२ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आणि वाढत्या उन्हामुळे तब्बल ७६ हजार ३२० हेक्टरवरील खरीप पिके करपून जाऊ लागली आहेत.
पावसा अभावी विशेषतः सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला असून पाने कोमेजून पिके वाळू लागली आहेत. तालुक्यात ५४,३५८ हेक्टरवर सोयाबीन, ९,१५८ हेक्टरवर कापूस, ७,७९९ हेक्टरवर तूर, आणि २,८६६ हेक्टरवर मूग यांसह इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. पूर्वा नक्षत्रातही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या आहेत. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरीप पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील नदी, नाले, तलाव आणि जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. उपलब्ध जलसाठा वेगाने खालावत असल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. याशिवाय, शेतशिवारात हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांसमोर जनावरे जगवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दुष्काळाची गडद छाया पाहता प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच संभाव्य पाणीटंचाई आणि चाराटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिक आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



