मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचा थरार! हिंगोली, नांदेडसह परभणीत सलग तीन धक्के

▫️हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ‘शिरली’ गाव; नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०९ जुलै २६
हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना ९ जुलै २६ मध्यरात्री भूकंपाच्या सलग तीन धक्क्यांनी हादरवून सोडले. मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली या गावात होता. पहिला आणि सर्वाधिक तीव्रतेचा धक्का मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला, ज्याची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंद झाली. त्यानंतर काही वेळातच, पहाटे २:१५आणि २:१७ वाजता अनुक्रमे ३.६ आणि ३.९ तीव्रतेचे आणखी दोन सौम्य धक्के जाणवले.
मध्यरात्रीच्या वेळेस बहुतांश नागरिक झोपेत असताना हे धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक असे तीनधक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवूनअसल्याचे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी. राहुल कर्डिले यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलेआहे. भूकंपाची पूर्वकल्पना मिळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवतानागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे. तसेच, पुन्हा असे धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडूनसुरक्षित आणि मोकळ्या जागेत थांबावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.



