क्राईम

मुखेडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक: ‘सफल गोल्ड’चे बियाणे बोगस? कृषी विभागाकडून पंचनाम्यास टाळाटाळ

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- १० जुलै २६

पावसाच्या लपंडावामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता बोगस बियाणे मारलेजात असल्याचा संतापजनक प्रकार मुखेड तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्यातील चांडोळा येथे तब्बल दोन एकरांवर (८० आर) पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाकडे तक्रार करूनही पंचनाम्यासाठी चालढकल होत असल्याने शेतकऱ्याने आता थेट ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

नेमका प्रकार काय? चांडोळा येथील शेतकरी हनिफाबी निजामोद्दीन यांच्या मालकीच्या गट क्र. ९२१ मध्ये एकूण १ हेक्टर ७४ आर जमीन आहे. यापैकी ८० आर (दोन एकर) क्षेत्रात त्यांनी ३० जून रोजीमोठ्या आशेने ‘३३५ सफल गोल्ड‘ या कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. मात्र, पेरणीला बरेच दिवस उलटूनही शेतात केवळ १० टक्केच बियाणे उगवले, तर ९० टक्के बियाणे मातीतच कुजूनगेले. या बोगस बियाण्यांमुळे ऐन खरीप हंगामात शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या फसवणुकीबाबत शेतकऱ्याच्या वतीने शेख चांदपाशा निजामोद्दीन यांनी मुखेड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि संबंधित बियाणे विक्रेत्या कृषी सेवा केंद्राकडे रीतसर तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार देऊनही कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ आणि विलंबकरत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी आणखीच चिंतेत सापडला आहे.

“प्रशासनाने तातडीने या नुकसानीचा पंचनामा करावा आणि संबंधित बोगस बियाणे कंपनीकडूनआम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी. जर आम्हाला वेळेवर न्याय मिळाला नाही, तर आम्ही या कंपनीआणि विक्रेत्याविरुद्ध थेट ग्राहक मंचात दाद मागू,” असा खणखणीत इशारा शेख चांदपाशा निजामोद्दीन यांनी दिला आहे.

एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे बाजारात सुकाळ झालेले बोगस बियाणे, अशा दुहेरी संकटात बळीराजा होरपळून निघत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button