उदगीरमध्ये पावसासाठी साकडे: ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी अदा केली ‘नमाज-ए-इस्तिस्का’

▫️पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह नागरिक चिंतेत; वरुणराजाच्या कृपेसाठी अल्लाहकडे विशेष दुवा
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क उदगीर:- १५ jule
पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही उदगीर शहर आणि परिसरात अद्याप समाधानकारक पाऊसन झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि चांगला पाऊस व्हावा यासाठी सोमवारी उदगीर येथील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘नमाज–ए–इस्तिस्का‘ (पावसासाठीची विशेष नमाज) अदाकेली आणि अल्लाहकडे कृपेच्या पावसाची याचना केली.

उदगीर येथील ईदगाह कमिटीच्या वतीने या विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू होऊनही कोरड्या पडलेल्या जमिनी आणि शेतकऱ्यांची हतबलता पाहता, संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी सकाळ पासूनच शहरातील विविध भागांतून आबालवृद्ध, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक ईदगाह मैदानावर जमा होऊ लागलेहोते. बघता बघता या ठिकाणी शेकडो नागरिकांचा जनसागर उसळला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि पावित्र्य राखून ही विशेष नमाज अदा करण्यात आली.

जेव्हा जेव्हा पावसाची दडी असते किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा मुस्लिम समाजातर्फे‘नमाज–ए–इस्तिस्का‘ पठण करण्याची प्राचीन परंपरा आहे. या विशेष नमाजचे पठण पूर्ण झाल्यानंतर इमामांनी विशेष दुवा (प्रार्थना) केली.
यावेळी इमामांनी आपल्या प्रार्थनेत म्हटले की, “हे अल्ला, आमच्या चुकांना क्षमा कर आणि तुझ्या कृपेचा (रहमतचा) पाऊस पाड. या पावसामुळे सुकलेली जमीन पुन्हा हिरवीगार होऊ दे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलू दे.” यासोबतच इमामांनी देशात आणि राज्यात अमन–चैन (शांतता), बंधुभाव, शेतकऱ्यांची समृद्धी आणि सर्व नागरिकांच्या सलामतीसाठीही दुवा मागितली. यावेळी उपस्थितशेकडो मुस्लिम बांधवांनी आकाशाकडे हात उंचावून आणि डोळ्यांत पाणी आणून अल्लाहकडे पावसासाठी आर्त हाक दिली.

निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रार्थना केल्या जात आहेत. ईदगाह मैदानावरील या सामुदायिक प्रार्थनेने सर्वांच्या मनात एक नवी आशा निर्माण केली आहे. मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असूनही अत्यंत शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरणात ही नमाज संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि चोख व्यवस्थेसाठी ईदगाह कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



