अखेर शासनाला जाग! मुखेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; ८ दिवसांचे उपोषण स्थगित

माजी जि.प. अध्यक्ष बेटमोगरेकर व शेतकरी नेते कलंबरकर यांच्या संघर्षाला यश; ५ हजारांची मदततोकडी, उर्वरित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लढा कायम.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १५ ऑक्टोंबर २६
महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार, राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये मुखेड तालुक्याचा दुष्काळी यादीत अखेर समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झालेअसून, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या नेतृत्वाखालील आठ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण व धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
१४ ऑक्टोबर रोजी शासनाने मुखेडचा दुष्काळी यादीत समावेश केल्याचा आदेश काढल्यानंतर, तहसीलदार अभयराज नंजुडे यांनी उपोषणस्थळी येऊन ही माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतरदिलीप पाटील बेटमोगरेकर आणि शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून आठव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाने जाहीर केलेली पाच हजाररुपयांची मदत तोकडी असून, शेतकऱ्यांच्या हक्काची मदत, पीकविमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठीचा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी ठाम भूमिका नेत्यांनी स्पष्ट केली आहे.
यापूर्वी शासनाने ट्रिगर–१ अंतर्गत राज्यातील २६५ तालुके दुष्काळी घोषित केले होते, परंतु डोंगराळ मुखेड तालुक्याला त्यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. आता शासनाने नव्याने ४० तालुक्यांचा समावेश करून एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नव्याने समाविष्ट केलेल्या या ४० तालुक्यांबाबत शासनाने ‘ट्रिगर–१‘ की ‘ट्रिगर–२‘ अंतर्गत दुष्काळ घोषित केला आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
मुखेड तालुक्याला ट्रिगर–१ मध्ये समाविष्ट करण्यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आली होती. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मुखेडच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘रास्ता रोको‘ करण्यात आला आणि ७ ऑक्टोबरपासून सलगसाखळी उपोषण सुरू होते. या संपूर्ण लढ्यात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्तेआणि पत्रकार बांधवांनी मोठी एकजूट दाखवत आंदोलनाला पाठिंबा दिला.
“हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि एकजुटीचा विजय आहे,” अशी कृतज्ञतेची भावना माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.




