नांदेड महापालिकेचा निर्लज्ज कारभार! इस्लाम पुऱ्यात नळातून आले गटारा सारखे पाणी; नागरिकांच्या जिवाशी खेळ!

▫️‘दूषित पाणी की विष?’ नागरिकांचा संतप्त सवाल
▫️ऐन उन्हाळ्यात प्रभाग क्र. १८ मध्ये पाण्यासाठी हाहाकार; सैलाब नगर, वाघी रोड भागात भीषणपाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र संताप!
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०२ जून २६
एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता आणि दुसरीकडे महापालिकेचा ढिसाळ कारभार! नांदेडच्या इस्लाम पुरा भागात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील नागरिकांच्या नळाला चक्क गटारासारखे काळेकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महापालिका प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघड–उघड खेळ मांडला जात असून, संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
दुसरीकडे, प्रभाग क्र. १८ मधील सैलाब नगर, वाघी रोड आणि दुल्हेशा रहमान नगर भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागात आधीच पाण्याचा थेंब–थेंब मिळणे कठीण झाले असताना, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
इस्लाम पुरा भागात नळाला आलेल्या दूषित पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हे पाणी पाहून कोणाचाही थरकाप उडेल अशी स्थिती आहे.
हेच दूषित पाणी पोटात गेल्याने उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो आणि कावीळ सारख्या गंभीर आजारांची लागणहोण्याची भीती निर्माण झाली आहे.

घरात लहान मुले आणि वृद्ध आजारी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल महिलांनीउपस्थित केला आहे आम्ही नियमित पाणीपट्टी आणि कर भरतो, मग आमच्या नशिबी गटाराचे पाणीका?” असा सवाल करत नागरिकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
सैलाब नगर, वाघी रोड आणि दुल्हेशा रहमान नगर परिसरातील नागरिकांनी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
“प्रशासनाने इस्लाम पुऱ्यातील दूषित पाण्याचा प्रश्न २४ तासांच्या आत सोडवावाआणि प्रभाग क्र. १८ मधील पाणीटंचाई दूर करून टँकरद्वारे तात्काळ पाणीपुरवठा करावा. अन्यथा, महापालिकेवर हंडामोर्चा काढण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वार्डातील नागरिकांन कडून ऐकण्यास मिळत आहे.
आता या गंभीर समस्येवर झोपलेले महापालिका प्रशासन जागे होणार का? की नागरिकांना अशाचप्रकारे नरकयातना सहन कराव्या लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



